
कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेले राजकीय द्वंद्व काही केल्या थांबताना दिसत नाही. आतापर्यंत कोरोना लसीकरणानंतर लस घेतलेल्या व्यक्तीला उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला असायचा. पण पश्चिम बंगालमध्ये आता लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता मोदींऐवजी ममता बनर्जींचा फोटो!
केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर ममता बॅनर्जी या आधीपासूनच सवाल उपस्थित करत आल्या आहेत. त्यांनी वारंवार देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आता तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवेळी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाणे हे आचारसंहितेच्या नियमांचे भंग असल्याचा आरोप तृणमूलने त्यावेळी केला होता.
