क्रेडीट कार्डद्वारे सोने खरेदीवर निर्बंध

मुंबई दि.१ – ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी यापुढे बँकांनी क्रेडीट कार्ड व इएमआय सुविधा देऊ नयेत असे आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केले आहेत. ग्राहकांकडून होत असलेल्या सोनेखरेदीला चाप बसवा आणि सोने आयात कमी व्हावी यासाठी हे उपाय योजले गेले असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर बॅकांतून सोन्याच्या नाण्याची खरेदी करणार्‍यांनाही क्रेडीट कार्ड सुविधा दिली जाऊ नये असेही रिझर्व्ह बँकेने बजावले आहे.

बँक व्यवसायातही अलिकडे स्पर्धा वाढली असल्याने अनेक बँका विमान तिकीटे, मोबाईल फोन, सोने खरेदीसाठी केलेल्या १० हजारांच्या पुढील खरेदीसाठी क्रेडीट कार्डावरही इएमआय सुविधा देतात. कांही बँकांनी तर व्यापारी कंपन्यांशी त्यासाठी टायअपही केले आहे. त्यात प्रोसेसिग फी न घेणे, व्याजदारात सवलती अशा योजनाही जाहीर केल्या जातात. मात्र असा व्यवसाय करताना सोने खरेदीला प्रोत्साहन मिळेल अशा योजना बँकांनी आणू नयेत असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

बँकांमधून केल्या जात असलेल्या सोने नाणी विक्रीवरही बँकांनी भर देऊ नये असेही रिझर्व्ह बँकेने सुचविले आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सोने नाणी विक्री बंदच करावी असेही आदेश दिले गेले असल्याचे समजते. यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने सोने खरेदीसाठी कर्ज दिले जाऊ नये अशी बंदी बँकांवर घातली आहे.