फोटोसह जपा त्या प्रसंगाचा गंधही.

अनेक प्रसंगांच्या आठवणी जपण्यासाठी फोटो काढले जातात. गत काळातील स्मृती पुन्हा चित्ररूपाने पाहण्याची आणि त्या आठवणींत रेंगाळण्याची मोठीच सोय फोटो तंत्रज्ञानामुळे झाली आहे. मात्र न परतीच्या प्रवासाला गेलेल्या आपल्या आप्तांच्या सहवासातील या आठवणी अनेक वेळा विशिष्ठ गंधांशीही जोडलेल्या असतात. फोटो पाहताना त्यावेळचा तो गंध पुन्हा श्वासात भरून घेता आला तर हे फोटो अधिक जिवंत होतील या खात्रीने संशोधकांनी व्यक्तीच्या प्रतिमेसोबत गंधही पकडू शकणारे उपकरण तयार केले असून ते कॅमेर्‍यांसोबत वापरता येणार आहे. मेडलिन असे या उपकरणाचे नामकरण केले गेले आहे.

वाढदिवसाच्या आठवणीत केकचा गंध, आपल्या जिवलगाचा आवडता शांपू व त्याचा गंध, ताज्या ब्रेडचा विशिष्ठ जेवणाच्या वेळच्या फोटोतील गंध किवा अगदी आपल्या आजीच्या साडीच्या मऊ चौघडीचा गंध किवा आपल्या सोनुल्याची अंघोळ झाल्यानंतर त्याच्या अंगाला येणारा गंध असा कोणताही वास आपण त्यामुळे त्या त्या प्रसंगाच्या फोटासोबतच जपून ठेवू शकणार आहोत.

यासाठी तयार करण्यात आलेले उपकरण फनेलच्या सारखेच आहे. ज्या वस्तूचा अथवा निसर्गाचा फोटो काढायचा तर त्या वस्तूवर हे फनेलच्या आकाराचे उपकरण ठेवायचे. त्यातील पंप त्या वस्तूसोबत असलेला गंध शोषून घेतो व ओडर ट्रॅपमध्ये साठवतो. हे म्हणजे एक मोठे इलेक्ट्रिक नाकच असते असेही म्हणता येईल. या वासांच्या कणांवर प्रक्रिया होते आणि त्याचा ग्राफ सारखा फॉर्म्युला तयार होतेा. याच फॉर्म्युल्यापासून कृत्रिम रित्या तो आठवणीतला गंध परत निर्माण करता येतो.

युजर हा ओडर ट्रॅप लॅबमध्ये नेऊन फिल्म धुतो तशाच प्रद्धतीने एक्स्पोज करून घेऊ शकतो असेही संशोधकांचे म्हणणे आहे.