ओबामांनी कन्यांना दिले म. गांधींच्या विचारांचे धडे

जोहान्सबर्ग दि.१ -दक्षिण आफ्रिकेच्या भेटीवर सहकुटुंब गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी नेल्सन मंडेला यांनी ज्या तुरूंगात एकूण २७ पैकी १८ वर्षे तुरूंगवास भोगला त्या रोबेन बेटावरील तुरूंगाला भेट देतानाच आपल्या मुलींना महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळींवरून मार्टिन ल्यूथर किग या अमेरिकन नेत्याला अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा कशी मिळाली याचा छोटासा पाठच दिला.

ओबामा आपल्या कन्या साशा आणि मलिसा यांना म्हणाले की भारताचे अहिंसेचा पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसावादी चळवळीची सुरवात खरेतर आफ्रिकेपासून केली कारण त्यावेळी ते आफ्रिकेतच वकीली करत होते. त्यानंतर भारतात परतल्यावर स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच लढा दिला. त्यापासून अनेक अमेरिकन व आफ्रिकन अमेरिकन नेत्यांना प्रेरणा मिळाली. अगदी मार्टिन ल्यूथर किंग यांचाही त्यात समावेश आहे.

यापूर्वी अमेरिकेतील एका शाळेत भाषण करतानाही ओबामा यांनी महात्मा गांधी जर आज हयात असते तर त्यांच्यासोबत जेवण घेणे आपल्याला फार आवडले असते असाही उल्लेख केला होता.