गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थनार्थ उतरल्या पंकजा

मुंबई दि.१- भाजपचे नेते व संसदेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी २००९ च्या निवडणकीत ८ कोटी रूपये खर्च झाल्याचे विधान करताच उसळलेल्या उलट सुलट प्रतिक्रियांबाबत त्यांची कन्या व बीडच्या आमदार पंकजा मुंडे पुढे सरसावल्या आहेत. फेसबुक या सोशल साईटवर त्यांनी वडीलांच्या विरोधात केल्या गेलेल्या विधानांबाबत अतिशय असभ्य भाषेत त्याचा निषेध केला आहे.

पंकजा म्हणतात, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातील बाहुली आहेत. ज्या हरामखोर माणसांनी आमचे मुंडे साहेब यांची चौकशी करण्याचे किवा त्यांना नोटीस देण्याचे आदेश दिले त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की जो वाघाच्या छातीचा आहे तो खरे बोलायला कधीच कचरत नाही. मुंडे साहेब तसेच आहेत. आम्ही खरे बोलायला कधीच भीत नाही.जेव्हा भाजप सत्तेवर येईल तेव्हा विविध घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना तुरूंगाची हवा खावी लागेल हे लक्षात ठेवावे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणूक खर्चासंबंधीच्या विधानानंतर काँग्रेसचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री मनीष तिवारी यांनी निवडणूक आयोगाला मुंडे यांना या विधानाबाबत नोटीस दिली जावी असे सांगितले होते तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही निवडणूक आयोगाने मुंडे यांच्यावर कारवाई करावी असे सांगितले होते. माहिती अधिकार हक्क कार्यकर्ते अनिल गाडगीळ यांनी मात्र मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाची ही वागणूक धक्कादायक असल्याचे आणि त्यांच्या सुशिक्षित आमदार कन्येने वापरलेली भाषा बरोबर नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment