राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवणे अडचणीचे ठरेल – नवाब मलिक


मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून राज्यात लागू असलेला लॉकडाऊन ठाकरे सरकार वाढवणार की उठवणार यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. ठाकरे सरकारने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध जाहीर केले असून परिस्थिती नियंत्रणात नसल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. पण सध्या कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन शिथील करण्याची मागणी होत आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान याबाबत महत्वाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

३१ तारखेपर्यंत राज्यात लॉकडाऊन आहे. पण राज्यात १५ असे जिल्हे आहेत, जिथे कोरोनाबाधितांची संख्या १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाऊन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊन सरसकट उठवणे अडचणीचे ठरेल. मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्बंध शिथील करण्यासंबंधी निर्णय घेतील, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आले असता म्हणाले होते की, सध्याचा कोरोनाकाळ फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरत आहे. लोकांना काही पटींमध्ये हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे, हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणे व्हावे लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असेही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाऊन वाढणार का असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये.