डेहराडून, दि.25 – उत्तराखंडमध्ये पावसाने सोमवारपासून पुन्हा जोर धरल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. आतापर्यंत मृतांचा आकडा 807 वर पोहचला असून केदारनाथ येथून मंगळवारी आणखी 127 मृतदेह बाहेर काढण्यात आले. केदारनाथ येथील बचावकार्यही आज संपले आहे. उत्तराखंडमधील महापूरात मृतांची संख्या 10 हजारांवर असल्याचा अंदाज येथील बचाव व मदतकार्यात गुंतलेले सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला आहे.
उत्तराखंडमधील मृतांचा आकडा १० हजारांवर?
तेहरी भागात मंगळवारी दरड कोसळल्याने त्यात एक महिला आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. सतत पडणार्या पावसामुळे हेलिकॉप्टरच्या मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. केदारनाथ येथील बचावकार्य पूर्ण झाले आहे. तर बद्रीनाथ येथे अजूनही काही लोकं अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री विजय बहूगुणा यांनी पूरात अडकलेल्या लोकांच्या नातेवाइकांना दिले आहे.
दरम्यान, मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यासाठी तूप आणि लाकडाने भरलेला ट्रक डेहराडूनहून केदारनाथ येथे रवाना करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयातून देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही हा आकडा एक हजारांपेक्षा जास्त असल्याची शक्यता सोमवारी व्यक्त केली होती.
