उघडाच एकदा तोंड !

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना एक फटका मारला आहे. तो नेमका फटका आहे की नाही आणि तो कितपत वर्मी बसणारा आहे याचे तपशील अजून कळलेले नाहीत. परंतु राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाजपाच्या नेत्यांना बजावले आहे. आपण राजकारणात कोणाशी युती करणार आणि कुणाशी नाही, याचा निर्णय आपण करणार आहोत. तेव्हा भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा पक्ष महायुतीत येणार असल्याच्या चर्चा करू नयेत, असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. राजकारणात कोणावर कोणती वेळ येईल हे काही सांगता येत नाही. म्हणून शहाणे राजकारणी लोक शक्यतो कोणालाही दुखवत नाहीत. राज ठाकरे यांनाही तसे करता आले असते. देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता बोलण्याची गरज नव्हती. ते नाव घेऊन सुद्धा ते स्पष्टपणे पण सौम्यपणे त्यांना आपल्या पक्षाच्या युतीबाबत चर्चा करू नये, असे म्हणू शकले असते. राज ठाकरे यांना कोणाशीही युती करण्याबाबत काही बोलणे आज गैरसोयीचे असेल किंवा कायमच त्यांचा एकला चलो रे चा निर्धार असेल तर तो त्यांच्या धोरणाचा भाग आहे. परंतु तो सांगत असताना फटकळपणा करण्याची काही गरज नव्हती.

अर्थात असा फटकळपणा न करता कोणालाही न दुखवणे हे चांगल्या, हुशार आणि निष्णात राजकारण्यांचे लक्षण असते. राज ठाकरे अशा कोणत्याही कॅटॅगरीत बसत नाहीत. आपल्याभोवती जमणारे चार लोक आणि भाषणाला जमणारी गर्दी यामुळे आपण फार मोठे नेते झालो आहोत असा भास त्यांना व्हायला लागला आहे आणि त्या भ्रमातच त्यांच्यापेक्षा किती तरी मोठ्या असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला ते खडसवायला लागले आहेत. माझ्या पक्षाच्या युतीबाबत काही बोलू नका, नाही तर मला बोलावे लागेल आणि मी तोंड उघडले तर तुम्हाला महाग पडेल, असा सज्जड दम राज ठाकरे यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे मोठे सौम्य प्रकृतीचे नेते आहेत आणि अशा प्रकारची बेफाट विधाने करणे त्यांच्या स्वभावात बसत नाही. म्हणून त्यांनी राज ठाकरे यांच्या या तोंडाळ विधानावर कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु भाजपाचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मात्र राज ठाकरे यांना आव्हान दिले आणि आपल्याजवळ जी काही माहिती असेल ती राज ठाकरे यांनी खुशाल जाहीर करावी, असे म्हटले.

असे आव्हान दिल्यानंतरही राज ठाकरे म्हणतात तसे तोंड उघडणार नाहीत. कारण त्यांनी तोंड उघडल्यावर फार मोठी खळबळजनक माहिती बाहेर पडणार आहे अशी काही स्थिती नाही. महाराष्ट्रात कधी कधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्ये कुरबुरी होतात आणि या दोघांची युती तुटते की काय, अशी शक्यता वाटायला लागते. कधी कधी अशा तणातणीत भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेशी युती तोडून मनसेशी युती करण्याचा विचार राज ठाकरे यांच्याजवळ बोलून दाखवला असण्याची शक्यता आहे आणि राज ठाकरे तोंड उघडून हिच माहिती बाहेर सांगणार असतील. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांची युती असली तरी ती फार सुखाने नांदते आहे असे नाही. भाजपाचे नेते कधी कधी शिवसेनेशी युती तोडण्याचा विचार करतात, तसे शिवसेनेचे नेते सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सूत जमवता येईल का, याची शक्यता पडताळून पहात असतात. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. या पलीकडे राज ठाकरे यांच्या बंद तोंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांना धमकी द्यावी असे काहीही असण्याची शक्यता नाही. परंतु मला तोंड उघडायला लावू नका, अशा वाक्यातून आपण फार मोठे माहीतगार नेते आहोत असा भास निर्माण होतो हे त्यांना माहीत आहे आणि आपल्या खर्‍या मर्यादांपेक्षा आपण मोठे आहोत हे भासवण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असतो. त्याचाच हा एक भाग आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाला राज ठाकरे यांची गरज भासत आहे ही गोष्ट खरी आहे. कारण आज तरी मनसेला पासंगाचे महत्व आले आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन किंवा तीन टक्के मतांच्या फरकाने पराभवाचे रुपांतर विजयात होत असते. हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. म्हणून अशा थोडक्या मतांचे धनी असलेल्या राज ठाकरेंना भाजपाच्या लेखी महत्व आले आहे. भाजपाला येत्या निवडणुकीत विजय मिळेल त्याचा परिणाम नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदावर होणार आहे आणि राज ठाकरे हे मोदींचे चाहते आहेत. म्हणून भाजपाचे नेते त्यांच्या युतीत येण्याची चर्चा करत आहेत. या पलीकडे मनसे आणि राज ठाकरे यांना काहीही महत्व नाही. संघटना आणि प्रत्यक्ष कार्य याबाबतीत मनसेच्या काही मर्यादा आहेत आणि त्या आता समजून चुकल्या आहेत. आपल्या हातात महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट आहे, अशा २००५ साली वल्गना करणार्‍या राज ठाकरे यांना तसा ब्ल्यू प्रिंट तयार सुद्धा करता आला नाही. त्यांच्या हातात नाशिकची महानगर पालिका आली आहे पण या शहरातच काय पण या शहराच्या एखाद्या प्रभागात सुद्धा त्यांना आपल्या ब्ल्यू प्रिंटचे दिवे लावता आलेले नाहीत. अफाट बोलण्या पलीकडे राज ठाकरे यांच्याकडे काहीही नाही.