बिहार तुरूंगातील मश्रूम पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूवर

मुझफ्फरपूर दि.२५ – दिल्ली, मुंबई, बंगलोर,कलकत्ता वा देशातील अन्य बड्या शहरातील पंचतारांकित हॉटेल्सच्या मेन्यूवर बिहार तुरूंगातील मश्रूम्स येण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील खुदीराम बोस मेमोरियल मध्यवर्ती कारागृहात गेले कांही महिने कैदी मश्रूम उत्पादनात मग्न झाले असून त्यांच्या कष्टाची फळे आता दृष्टीक्षेपात आली आहेत.

या संबंधी माहिती देताना तुरूंगाधिकारी इफ्तिकार अहमद म्हणाले की या तुरूंगातील २०० कैद्यांना मश्रूम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले असून तुरूंगाच्या आवारातच या कैद्यांनी अळंबी उत्पादन घेणे सुरू केले आहे. राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ञ संशोधकांनी यासाठी सहकार्य केले असून या कैद्यांना अळंबी लागवडीचे प्रशिक्षण दिले आहे. ही अळंबी देशातील पंचतारांकित हॉटेल्सना पुरविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे कैद्यांना थोडी अधिक मिळकत होऊ शकणार आहे. कृषी विद्यापीठातील अधिकार्‍यांनी कैद्यांना अळंबीची गुणवत्ता आणि लागवड कौशल्ये शिकविली आहेत आणि कैद्यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेण्यात यशही मिळविले आहे.