चर्चा उघड कराच- विनोद तावडे

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे अशी भूमिका भाजपची होती. मनसेबाबतही आमची भूमिका तीच आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना त्यांच्यासोबत झालेली चर्चा उघड करायची असेल तर त्यांनी जरूर करावी. अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे बोलताना महायुतीतील समावेशाबाबत वक्तव्य न थांबवल्यास ‘त्या’ बैठकीतील चर्चा उघड करण्याची धमकी दिली. यावर तावडे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी सत्ताधा-यांच्या विरोधात एकत्र यायला हवे, अशी भाजपची भूमिका आहे. औरंगाबाद येथील बैठकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याची प्रथम घोषणा केली होती. तेव्हापासून भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्या अनुषंगानेच राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी आणि शेकाप सारख्या पक्षांना आवाहन करण्यात येत आहे. तशीच चर्चा मनसेबाबत झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जरूर त्या चर्चा उघड कराव्यात. आम्ही त्यांचे स्वागतच करू, अशा शब्दांत तावडे यांनी पलटवार केला .

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचा सूतोवाचही भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Leave a Comment