नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर हल्ला करून २९ जणांना ठार केले आणि १२५ जणांना जखमी केले. मारले ते कोण होते याची चर्चा तर झालीच कारण ते कॉंग्रेसचे नेते होते पण या घटनेनंतर दोन गोष्टींवर फार चर्चा झाली. नक्षलवाद्यांनी केसालाही धक्का न लावता कोणाला सोडले ? कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी वेचून मारले पण आमदार कबासी लखमा याला अजीबात धक्का लावला नाही. ही परिवर्तन रॅली आपल्या मार्गाने चालली होती पण तिचा रस्ता बदलून तिला नक्षलवाद्यांच्या जाळ्यात आणण्याचे कामही याच आमदाराने केले होते. याचा अर्थ हा आमदार फितूर होता. तो नक्षलवाद्यांना मदत करीत होता. आता हा आमदार लखमा पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात सापडला आहे. कॉंग्रेसचे नेते जर नक्षलवाद्यांना मदत करीत असतील तर लखमा याच्या चौकशीत ते नेते कोण यावर नक्कीच प्रकाश पडेल. अनेक कॉंग्रेस नेत्यांचा पोलखोल होईल. म्हणून आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की आपली नावे प्रकट होण्याच्या आतच लखमाचा काटा काढावा असा विचार करून कोणी तरी लखमाचा खूनही करू शकेल. काय होईल हे सांगता येत नाही.
कॉंग्रेसचे नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी काहीही करू शकतात. त्यांना पक्षातूनही काही शिक्षा होत नाही. आता लखमा यालाही पक्षाकडून काही विचारले जाणार नाही कारण त्याला त्रास दिला तर त्याच्या जातीचे मतदार कॉंग्रेसवर नाराज होतील. आता निवडणूक जवळ आली आहे तेव्हा आधी मतांचा विचार करा आणि नंतर देशाचा विचार करा. नक्षलवाद हा देशातला सर्वात मोठा धोका आहे असे मनमोहनसिंग म्हणत असतात. या नक्षलवाद्यांना बाहेरून कोणी पाठींबा देतेय का यावर खूप चर्चा होते पण त्यात काही तथ्य नाही. त्याना घरातून आणि सत्ताधारी पक्षाकडूनच मदत मिळत आहे. गडचिरोेली तालुक्यातही असाच प्रकार प्रकट झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी गेल्या आठवड्यात तिघांना ठार केले. या तिघांत लोखंडाच्या खाणीचं खोदकाम करणार्या दोन कंपन्यांचे अधिकारी होते. ते खाणकामाबाबत तडजोड करायला गेेले होते. त्यांच्यात काही तरी देण्याघेण्याच्या वाटाघाटी सुरू होत्या. याचा अर्थ अशा वाटाघाटी सुरू असतात असा होतो. काल गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवणारी एक रुग्णवाहिका पकडण्यात आली. या गाडीत काही स्फोटके आणि बंदुका सापडल्या.
या प्रकाराने खळबळ माजली. पोलिसांना गस्तीच्या दरम्यान ही गाडी संशयास्पद रितीने जात असल्याचे दिसले म्हणून ती अडवली तेव्हा तिच्यात काही औषधे आणि शस्त्रे सापडली. सरकारची गाडी अशी शस्त्रे घेऊन जाते ही गोष्ट नवलाचीच होती. म्हणून पोलिसांनी या गाडीतल्या चौघांना अटक केली तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. या गाडीत स्फोटके होती हे खरे पण या स्फोटकांची माहिती त्यांच्यापेक्षा अधिक स्फोटक होती. कारण ही सारी सामुग्री नक्षलवाद्यांना पोचवली जात होती. ही रुग्णवाहिका गडचिरोली तालुक्यातल्या पोर्ला आरोग्य केन्द्राची होती आणि या गाडीत या केन्द्राचे चार कर्मचारी होते. त्यांना अटक करण्यात आली. पण ही रुग्णवाहिका डॉक्टरांच्या परवानगी शिवाय अशा कामासाठी नक्कीच वापरली जात नाही. त्यावरून डॉक्टरांचा तर संशय आलाच पण ही शस्त्रे आली कोठून असा प्रश्न निर्माण झाला. ती कॉंग्रेसचे नेते बंडोपंत मल्लेवार यांनी पुरवलेली होती. हे नेते गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. एवढा ज्येष्ठ नेता नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवितो ही माहिती धक्कादायक होती. कॉंग्रेससाठीही धक्कादायक आणि देशासाठीही धक्कादायक कारण कॉंग्रेसचे सरकार नक्षलवादाशी कठोर सामना करण्याच्या वल्गना देत असते आणि त्याच पक्षाचे नेते अशी शस्त्रे पुरवून त्यांना पोसत असते ही विसंगती अस्वस्थ करणारी आहे.
फितुरांची अवस्था मोठी वित्रित्र असते. छत्तीसगडात कॉंग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. तिथे भाजपाचे सरकार आहे त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपा सरकारच्या डोक्यावर या हल्ल्याचे खापर फोडले. मात्र नंतर लखमा प्रकरण उघड झाले. हा प्रकार घडला आणि कॉंग्रेसचे नेते एकत्र जमून विचार करायला लागले. आपल्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला झाला असला तरीही आपण घाबरलो नाही हे जगाला दाखवून देण्यासाठी त्यांनी आपली परिवर्तन रॅली पुन्हा काढण्याचा निर्णय घेेतला आणि तसा तो जाहीरही केला. पण दुसर्याच दिवशी हा बेत रद्द केला. आपण परिवर्तन रॅली काढली आणि पुन्हा आपल्याच पक्षाच्या कोणीतरी लखमा याच्या सारखीच नक्षलवाद्यांना मदत केली तर पुन्हा हल्ला होऊ शकतो. नक्षलवाद्यांना मदत करणार्या आपल्याच पक्षातल्या फितुरांच्या भीतीने त्यांनी आपली दुसरी परिवर्तन रॅली रद्द केली. म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांना नक्षलवाद्यांची भीती नाही पण आपल्याच पक्षातल्या नक्षलवाद्यांच्या छुप्या पाठीराख्यांची भीती आहे. आपल्यातला नेमका कोण त्यांना मिळालेला आहे याची नेमकी माहितीही त्यांना नाही.