सिडनी, दि.21 – आपण ज्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही, अशा अनेक घटना-गोष्टी या जगात घडू शकतात, तसेच त्या घडतातही. त्याचबरोबर त्याची दुसरी बाजू म्हणजे जर आपण ठरवले तर काहीही करू शकतो, इतकी प्रगत यंत्रणाही विकसीत झाली आहे. कधी कुणाच्या बाबतीत काय घडेल, याचा अंदाज येणार नाही. याचा विचार करण्याचे कारण म्हणजे सिडनीत एक अशी घटना घडली आहे की त्यामुळे त्याठिकाणचे लोक काहीसे अवाक झाले आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना एका महिलेचा अपघात झाला. तिच्यावर उपचार करण्यात आले. आठ दिवसांच्या उपचारानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा ती तिची मातृभाषा इंग्रजी भाषेऐवजी चक्क फ्रेंच भाषेत बोलू लागली होती. तिच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनीही काहीसा प्रयत्न करून पाहिला. मात्र ती फ्रेंच भाषेला अनुसरूनच बोलू लागली असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
