वयाच्या दहाव्या वर्षीच हार्वर्ड विद्यापीठात मजल

मेक्सिको, दि. 21 – हार्वर्ड विद्यापीठ म्हणजे एक नावजलेले विद्यापीठ. त्या विद्यापीठातून बाहेर पडलेले सर्वजण चांगल्या ठिकाणी, बड्या पगाराच्या नोकरीवर आणि तिशी-चाळीशीतील व्यक्ती, असे गणित ठरलेले मात्र, आता त्या विद्यापीठात एका दहा वर्षीय मुलाला प्रवेश मिळाला आहे. लुइस रॉबरटो रेमिरेज असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

नावाजलेले वैज्ञानिक आयनस्टाईन सारखी बुद्धीमत्ता असलेला लुइस हा यावर्षी विद्यापीठात क्वांटम भौतिक- विज्ञानाचा अभ्यास करणार आहे. मिकोएकन रेडीओ आणि दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या कार्यक्रमाच्या माध्यमातून लुइसने सांगितले की, मला आपली स्वतःची अशी एक कंपनी स्थापन करायची आहे आणि त्याद्वारे मला मी ज्यांचा शोध लावला आहे अशा वस्तुंची विक्री करायची आहे. जमोरामध्ये राहणार्‍या लुइसने वयाच्या पाचव्या वर्षीच इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत केले आहे. तसेच तो आता फ्रेंच आणि चीनी भाषेचेही शिक्षण घेत आहे.

लुइसचे वडील रॉबरटो रेमिरेज यांनी सांगितले की, आम्हाला दोन वर्षांपूर्वी समजले की, लुइस हा इतर मुलांपेक्षा काही वेगळा आहे. तो वेगळे काही तरी करू शकतो याची जाणीवही झाली. त्याची आवड- निवड, ध्येय- आकांक्षा त्याचबरोबर इतर गोष्टीही त्याच्या समवयस्क मुलांपेक्षा काहीशा वेगळ्या आहेत. वयाच्या आठव्या वर्षी लुइसचा बुद्धीगुणांक 152 ते 160 पर्यंत होता, जो वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बुद्धीगुणांकाच्या आसपास आहे. मला माझ्या मुलांच्या बुद्धीमत्तेवर तसेच त्याच्या प्रतिभेचा अभिमान आहे.