बिजिंग दि.१८ – सेकंदाला ३३.८६ क्वाड्रीलियन ऑपरेशन करू शकणारा जगातील सर्वाधिक वेगवान संगणक बनविण्यात चीनला यश आले असून वेळेपूर्वी दोन वर्षे अगोदरच हा संगणक बनला असल्याचेही समजते. चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी मधील तंत्रज्ञांनी हा संगणक साकारला असून त्याचे नामकरण तियान्हे २ किंवा मिल्की वे २ असे करण्यात आले आहे. यामुळे आत्तापर्यंत जगात सर्वाधिक वेगवान मानल्या जाणार्या अमेरिकेच्या टायटन एक्स के ७ सुपर कॉम्प्युटरचे स्थान दोन नंबरवर गेले आहे. हा संगणक युएसच्या ओकरिज नॅशनल लॅबोरेटरीत बसविला गेला आहे.
चीनने तियान्हे ए वन हा पहिला सुपर कम्प्युटर बनविल्यानंतर नोव्हेंबर २०१० ते जून २०११ पर्यंत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक असलेला देश असा मान आपल्याकडे राखला होता मात्र त्यांनतर जपानने के संगणक बनवून त्यांना या स्पर्धेत मागे टाकले होते. त्यानंतर अमेरिकेचा टायटन आला होता. पण आता मात्र पुन्हा एकदा चीनने तियान्हे दोनच्या रूपाने अव्वल स्थान प्राप्त केले असून हा संगणक ग्वांझो येथील नॅशनल सुपर कॉम्प्युटर सेंटर मध्ये या वर्षअखेर बसविला जाणार आहे.
तियान्हे दोनचे सर्व भाग चीनमध्येच विकसित करण्यात आले असून मेन कॉम्प्युटर पार्ट म्हणून इंटेलचा वापर करण्यात आला आहे.