सोलापूरच्या उद्योगाला चिनी शिष्टमंडळाची भेट

सोलापूरच्याप्रीसिजन कॅमशाफ्ट या उद्योगाला चीनच्या सरकारी शिष्टमंडळाने भेट दिली आणि या उद्योगाच्या सोलापुरातल्या कारखान्याची पाहणी केली. प्रीसिजन कॅमशाफ्ट या कंपनीने चीनच्या नानकिंग प्रांतात गेल्या वर्षी आपल्या उद्योगाची शाखा सुरू केली आहे. या कारखान्यात तयार होणारे कॅमशाफ्ट चीनमधील वाहनांसाठी वापरले जातात. या कंपनीने सोलापुरात उत्तम उत्पादन करून जगातले वाहनाच्या या सुट्या भागाचे १२ टक्के मार्केट काबीज केले आहे. जगातल्या सर्व नामांकित कंपन्या प्रीसिजनचा हा भाग वापरतात. म्हणून या कंपन्यांच्या चीनमधील कारखान्यांनी प्रीसिजन कंपनीला आपले एक युनिट चीनमध्ये सुरू करण्यास प्रोत्साहन दिले व गेल्या वर्षी वूहान शहरात हा कारखाना सुरू झाला.

सुमारे नऊ महिन्यांच्या या काळात प्रीसिजनचे चीनमधील कामकाज चांगले सुरू राहिले असून आता तिथे दुसरे यूनिट सुरू होणार आहे. त्या आधी या सरकारी शिष्टमंडळाने सोलापुरात येऊन सोलापूरच्या या कारखान्याची पाहणी केली. शून्य टक्के रिजेक्शन हे या उद्योेगाचे वैशिष्ट्य ठरले असून अनेकदा जपानमधील काही शिष्टमंडळांनी या कारखान्याला भेट दिली आहे. आज हुझाऊ शहराच्या महापौरांसह आठ शहरांच्या प्रमुखांनी सोलापूरला भेट दिली. प्रीसिजन कंपनीच्या कामकाजाची त्यांनी प्रशंसा केली. भारतातून चीनमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारलेला कोणताही उद्योग येत असेल तर त्याचे स्वागत करायला तिथले सरकार उत्सुक आहे अशी माहिती या शिष्टमंडळाचे प्रमुख वु जी पिंग यांनी पत्रकारांशी बोेलताना दिली.

या पत्रकार भेटीच्या वेळी प्रीसिजनचे कॅमशाफ्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, सौ. सुहासिनी शहा हे दोघे उपस्थित होते. या शिष्टमंडळाने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निवासस्थानावर उभारण्यात आलेल्या कोटणीस स्मारकालाही भेट दिली. चीनसाठी डॉ. कोटणीस यांनी जे योगदान दिले आहे त्या बद्दल त्यांनी कृतज्ञता प्रकट केली.