असांजे प्रकरणात ब्रिटनशी संघर्षाची आली होती वेळ

क्विटो दि.१७ – स्वीडनला हस्तांतरीत केले जाऊ नये यासाठी विकिलिक्सचा प्रमुख ज्युलियन असांजे याने इक्वेडोरच्या दुतावासात आश्रय घेतल्याच्या घटनेला वर्ष होत आले असतानाच असांजेच्या प्रकरणात ब्रिटनशी संघर्षाची वेळ अगदी जवळ आली होती असा गौप्यस्फोट इक्वेडोरच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे.

इक्वेडोरचे उपपरराष्ट्र मंत्री मार्को अल्बुजा यांच्या म्हणण्यानुसार मूळचा ऑस्ट्रेलियन हॅकर ज्युलियन असांजेने त्याच्यावर असलेल्या लैगिंक छळ प्रकरणात स्वीडनला ब्रिटनकडून हस्तांतरण केले जाऊ नये यासाठी लंडनमधील इक्वेडोरच्या दुतावासात आश्रय घेतला होता. १९ जूनला या घटनेला वर्ष होत आहे. मात्र त्यावेळी ऑगस्टमध्येच ब्रिटनच्या पोलिसांनी इक्वेडोरच्या दुतावासात घुसून असांजेला ताब्यात घेण्याची धमकी दिली होती. हा एकप्रकारे राजनितीक संहितेचा भंगच होता व त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध जवळजवळ तुटण्याच्या मार्गावर होते. मात्र या अडचणीतून मार्ग निघाल्याने आता दोन्ही देशांचे संबंध सुरळीत झाले आहेत.

असंजे अजूनही इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासातच आश्रयास असून तेथून तो बाहेर पडला तर त्याला त्वरीत अटक करण्यासठी ब्रिटनचे पोलिस त्याच्यावर अहोरात्र लक्ष ठेवून आहेत.