मुंबई दि.१५ – मधुकरराव पिचड मंत्रिमंडळात गेल्यामुळे रिकाम्या असलेल्या राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईत आज बैठक होत आहे. मात्र या पदासाठी ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नांव अगोदरच निश्चित करण्यात आल्याचे राष्ट्रवादीतील अंतर्गत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
यासंबंधात मिळालेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. भाजपने महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी तरूण तडफदार आमदार देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही तरूण तडफदार प्रदेशाध्यक्ष देण्याचा निर्णय घेतला होता आणि तसे संकेतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले असल्याचे समजते.
माजी मंत्री भास्कर जाधव यांचेही नांव या पदाच्या शर्यतीत घेतले जात असले तरी निवडणुकांत तरूणांचा असणारा मोठा मतदारवर्ग लक्षात घेता तरूणांनाचा संधी दिली जावी असा विचार मांडला गेला होता. त्यातच यावेळी तरूण चेहर्यांना संधी दिली गेली नाही तर या नेत्यांची उमेद खचेल व त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागेल. कदाचित नाराज नेते पक्षातून बाहेर पडण्याचाही विचार करतील या सर्व बाबी लक्षात घेऊनच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडायचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.