प्रिन्स विल्यम्समध्ये सापडले भारतीय जीन्स

लंडन दि.१५ – लंडनच्या राजगादीचा दोन नंबरचा वारस आणि ड्यूक ऑफ केंब्रिज प्रिन्स विल्यम्स भारतीय पूर्वज असलेला राजगादीवर येणारा पहिलाच राजा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एडिन बर्ग विद्यापीठातील जनुकशास्त्र तज्ञ जिम विल्सन यांनी विल्यम्सच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांच्या लाळेतील डीएनएत तपासले असता त्यात भारतीय डीएनए आढळला असल्याचे समजते.

ही भारतीय नाळ विल्यम्सची आई डायना हिच्यामार्फत जोडली गेली असल्याचेही विल्सन यांचे म्हणणे आहे. डायनाचे खापर पणजोबा थिओडोर फोर्बस हे १७८८ ते १८२० या काळात इस्ट इंडिया कंपनी तर्फे गुजराथेतील सुरत येथे कार्यरत होते. तेव्हा त्यांची हाऊसकीपर असलेल्या एलिझा हिच्याकडून हा डीएनए पास झाला असावा असे विल्सन यांचे म्हणणे आहे. विल्यम्स यांच्यात सापडलेला हा डीएनए हा एकमेव नॉन युरोपियन डीएनए असून तो आईकडून मुलांकडे जाणारा डीएनए आहे. त्यामुळे एलिझाकडून तिच्या मुलींकडे व त्यातूनच तो डायना कडे पास झाला असावा आणि आता तो तिच्या मुलांमध्ये आला आहे.

मात्र हा डीएनए फक्त मुलींकडूनच पुढच्या पिढीत जात असल्याने विल्यम्सच्या मुलामध्ये तो येण्याची शक्यता नाही. त्यामुळे विल्यम्स आणि केट यांच्या जुलैत जन्मणार्‍या बाळामध्येही तो असणार नाही असेही विल्सन यांचे म्हणणे आहे.