भारताचा पहिला नेव्हीगेशन सॅटेलाईट १ जुलैला अंतराळात

बंगलोर दि.१४ – भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) तर्फे देशाचा पहिला नेव्हीगेशन सॅटेलाईट १ जुलैला अवकाशात झेप घेणार आहे. रात्री ११.४३ मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडला जाणार असून त्यासाठीच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उपग्रहाच्या उड्डाणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हा उपग्रह संपूर्ण देशी बनावटीचा आहे.

वास्तविक हा उपग्रह या महिन्याच्या सुरवातीलाच अवकाशात सोडला जाणार होता. मात्र चाचण्यांच्या वेळी दुसर्‍या तपासणीत इलेक्ट्रीकल चेकअप करताना कांही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्याचे उड्डाण पुढे ढकलले गेले होते.  त्या दूर केल्यानंतरच आता हा उपग्रह सोडला जात आहे.

१४२५ किलो वजनाचा हा सॅटेलाईट १० वर्षांपर्यंत कार्यरत राहणार आहे. भूभाग, आकाश व समुद्र अशा तिन्ही ठिकाणी नेव्हीगेशन सेवा देण्यास हा उपग्रह सक्षम असून आपतकाळीही तो मदत करू शकणार आहे. वाहन टॅकिंगसाठीही या उपग्रहाची मदत होणार आहे. २०१४ -१५ या काळात भारत असे सहा उपग्रह सोडणार असून ते कार्यरत झाल्यानंतर अधिक अचूक पोझिशन समजण्यास मदत मिळणार असल्याचेही इस्त्रोतील अधिकार्‍यानी सांगितले.