मास्क न लावल्याने थायलंड पंतप्रधानांना दंड

थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ चा यांना मास्क न लावल्याबद्दल ६ हजार बात म्हणजे १४२७० रुपये दंड ठोठावला गेला आहे. थायलंड सरकार करोनाच्या नव्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी संघर्ष करत आहे. १ मे पासून थायलंड मध्ये देशाच्या नागरिकांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांवर प्रवेश बंदी घातली गेली असून भारतीय नागरिकांना ही बंदी लागू आहे.

बँकॉक पोस्टने दिलेल्या बातमीनुसार सोमवार पासून शहरात मास्क वापर बंधनकारक केला गेला आहे. पंतप्रधान जनरल प्रयुत हे सोमवारी लस खरेदी संदर्भात सल्लागारांबरोबर एक बैठक घेत होते तेव्हा बाकी सदस्यांनी मास्क घातला होता पण पंतप्रधानांनी मास्क घातला नव्हता. त्यावर बँक गव्हर्नर आश्विन क्वानमुआंग यांनी फेसबुकवर मास्क विना असलेल्या पंतप्रधानांचा फोटो शेअर करून पोलिसात त्यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर सुद्धा पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार टीका सुरु झाल्यावर शहर अधिकारी जागे झाले आणि त्यांनी पंतप्रधानांना दंड ठोठावला.

थायलंड मध्ये सोमवारी करोनाच्या २०४८ नव्या केसेस सापडल्या असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.