मुंबई दि.६ – रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची जुळी मुले आकाश आणि इशा घरच्या व्यवसायत पदार्पणास सिद्ध झाली असल्याचे वृत्त आहे. अर्थात यासाठी थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे कारण या दोघांचे शिक्षण पूर्ण होताच ते वडिलांच्या व्यवसायात कार्यरत होतील असे वृत्त आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत असून त्यात अब्जाधीश आईवडिल आणि आजी कोकीलाबेन यांच्यासह इशा आणि आकाशही हजर राहणार आहेत. मात्र त्यांच्या व्यवसाय पदार्पणाची घोषणा आज केली जाणार नाही असे रिलायन्सच्या वरीष्ठ अधिकार्यां्कडून समजते. रिलायन्स समुह लवकरच टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायाचा विस्तार करणार आहे. ही दोन्ही मुले याच व्यवसायात वडिलांना सहाय्य करतील असेही समजते.
आकाश अंबानी यांनी ब्राऊन विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आहे तर इशाने येल विद्यापीठातून सायकॉलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीज या विषयात पदवी घेतली आहे. मुकेश यांना तीन मुले आहेत. आकाश टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायातील ग्राहक कक्ष सांभाळण्यास अधिक उत्सुक असल्याचेही सांगितले जात आहे.
मुकेश आणि अनिल अंबानी या दोन भावांनी १९८० साली शिक्षण पूर्ण केल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येच कामाला सुरवात केली होती.