आय क्यू किंवा बुद्धयांक मोजण्याच्या अनेक पद्धती सध्या जगात प्रचलित आहेत. त्यावरून माणसाची बुद्धीमत्ता जशी कळते तसेच मतिमंद, गतीमंद असलेल्यांचेही निदान करता येते. न्यूझीलंड येथील ड्यूक विद्यापीठातील सायकॉलॉजिकल शास्त्रज्ञ इडन शालेव्ह यांनी त्यांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या संशोधनात डोळ्यातील रेटिना मध्ये असलेल्या रक्तवाहिन्या तपासून माणसाचा आय क्यू ठरविता येऊ शकतो असे सिद्ध केले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की शरीरातील रक्तवाहिन्यातूनच मेंदूला प्राणवायू आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा केला जात असतो. डोळ्यातील नेत्रपटल किवा रेटिना मधील रक्तवाहिन्याही अन्य रक्तवाहिन्यांप्रमाणेच शरीरात कार्यरत असतात. त्यांचा आकार, स्ट्रक्चर हेही अन्य रक्तवाहिन्यांप्रमाणेच असते. डिजिटल रेटिनल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या संशोधकांनी सुमारे १००० लोकांमधील या रक्तवाहिन्यांची रूंदी मोजली. हे सर्व लोक एप्रिल १९७२ ते १९७३ या वर्षात जन्मलेले होते म्हणजे ते ३८ वयोगटातील होते.
या निरीक्षणातून त्यांना असे आढळले की ज्यांच्या डोळ्यातील रक्तवाहिन्या अधिक रूंद आहेत त्यांचा आय क्यू कमी आहे. अर्थात हे निदान काढताना या व्यक्तींची जीवनशैली, त्यांच्याभोवताचे वातावरण आणि त्यांच्या आरोग्याचाही विचार करण्यात आला. मात्र नंतर असेही दिसून आले की ज्यांचा आयक्यू कमी आढळला ते लहान असतानाही त्यांचा आयक्यू कमीच होता.
त्यामुळे आता या संशोधकांचे असे मत आहे की लहानपणीच ही चाचणी घेऊन आयक्यू मोजता आला तर मेंदूतील प्राणवायूची पातळी पुरेशी ठेवण्यासाठी प्रयत्न करता येतील व त्यामुळे वयानुसार या व्यक्तींना होणारे विकार दूर ठेवणे शक्य होईल.