कृत्रिम लिव्हर बनविण्यात संशोधकांना यश

लिव्हर म्हणजे यकृताचे वाढत चाललेले विकार आणि प्रत्यारोपण करताना येणार्‍या विविध अडचणी यावर मात करण्यासाठी अमेरिकेच्या एमआयटी संस्थेतील संशोधकांनी कृत्रिम लिव्हर बनविण्यात यश मिळविले असून या संशोधकात भारतीय वंशाच्या संशोधकाचाही समावेश आहे.

यकृत किवा लिव्हर हा असा अवयव आहे की तो थोड्या प्रमाणात कापून काढला तरी कालांतराने पुन्हा त्याची वाढ होऊन तो पूर्वपदावर येतो. सिर्हॉ सिस, कॅन्सर, हेपिटायटीस सी अशा अनेक रोगात लिव्हरचा बराचसा भाग काढून टाकावा लागतो. मात्र लिव्हरच्या पेशी मानवी शरीराच्या बाहेर वाढू शकत नाहीत. वरील संशोधनात सहभागी असलेल्या संगिता भाटिया या भारतीय वंशाच्या संशोधक याबाबत माहिती देताना म्हणाल्या की त्यांच्या टीमने अशी रासायनिक संयुगे शोधली आहेत की त्यामुळे लिव्हर प्रयोगशाळेतही वाढविता येणार आहे. इतकेच नव्हे तर लिव्हरच्या टिश्यू त्यापद्धतीने तयार करता येणार आहेत. परिणामी कृत्रिक लिव्हर करणे शक्य बनले आहे.

या कृत्रिम लिव्हरमुळे यकृताच्या विविध प्रकारच्या दुखण्यात प्रत्यारोपण करणे शक्य होणार आहे. जगात आज पाच कोटी रूग्णांना लिव्हर प्रत्यारोपणाची गरज आहे. या पद्धतीने वाढविलेल्या यकृतामुळे त्यांच्यावरही उपचार करणे शक्य होणार आहे. डोनर जर तरूण असतील तर त्यांच्या यकृताच्या पेशींपासून नवीन पेशी तयार करणे अधिक आरोग्यदायी ठरते आहे. भविष्यात पॉलिमर टिश्यूच तयार करण्याचा संशोधकांचा प्रयत्न असून त्याचे प्रयोग उंदरांवर करण्यात येत आहेत असेही भाटिया यांनी सांगितले.