सुपरमॅनची पंच्याहत्तरी

गेली अनेक वर्षे जनमानसावर अधिराज्य गाजविणारा कॉमिक हिरो सुपरमॅन यंदा पंच्याहत्तर वर्षांचा झाला असून त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त त्याच्या निर्मात्यांनी त्याला नवीन लोगो भेट दिला आहे. वर्षभर सुपरमॅनच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचेही समजते.

डीसी एन्टरटेनर आणि वॉर्नर ब्रदर्स यांनी संयुक्त रित्या सुपरमॅनची निर्मिती केली आहे. त्याच्यावरची कॉमिक्स आणि चित्रपट यांना वाचक आणि प्रेक्षकांचा अतोनात प्रतिसाद मिळाला आहे. मॅन ऑफ स्टील असे बिरूद मिरविणार्‍या सुपरमॅनची लाल, निळ्या चमकदार रंगाच्या कपडयातील आणि मागे उडणारी झूल अशी छबी वाचकांच्या मनावर जणू कोरली गेली आहे.

या स्टील मॅनच्या सन्मानार्थ डीसी एन्टरटेनर सुपरमॅन अनचेन्ड सिरीज सुरू करत असून त्यात १९३० सालच्या पहिल्या आवृत्तीपासूनची सर्व कव्हर्स छापली जाणार आहेत. ही सिरीज १२ जूनला प्रकाशित केली जात आहे. त्याविषयी बोलताना कंपनीचे अध्यक्ष डेन नेल्सन म्हणाले की सुपरमॅन हे जगातील सर्वाधिक प्रभावशाली कॉमिक असून आजही त्याची लोकप्रियता अबाधित आहे.

दिग्दर्शक झॅक स्नायडर यांनी तयार केलेला मॅन ऑफ स्टील हा सुपरमॅनवरील चित्रपट १४ जूनला रिलीज केला जात आहे तसेच नवीन अॅनिमेटेड चित्रपटही तयार केला जात असून त्यात सुपरमॅनचा ७५ वर्षांचा इतिहास सांगितला जाणार आहे. १९३८ च्या जून महिन्यात सुपरमॅनचे कॉमिक नंबर १ प्रकाशित झाले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याची न्यायी, सत्यप्रिय प्रतिमा जपली गेली आहे. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा तारणहार सुपरमॅन एकंदरीत म्हातारा व्हायला तयार नाही हेच खरे.

Leave a Comment