लंडन दि.३ – ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून चांगलेच विसराळू आहेत याची प्रचिती त्यांनी पुन्हा एकदा दिली आहे. झाले असे की ते आपली पत्नी आणि तीन मुलांसह इबिझा येथे सुटीवर गेले आहेत. मात्र प्रवासाला निघताना आपला पासपोर्ट बरोबर आहे की नाही याची खात्री न करून घेताच ते गॅटविक विमानतळावर पोहोचले. तेथे गेल्यावर पासपोर्ट घरी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. विमान सुटायला थोडाच अवधी होता. अखेर पोलिस अधिकार्यांनी धावतपळत जाऊन त्यांचा पासपोर्ट आणून अगदी वेळेत त्यांच्याकडे सोपविला आणि पंतप्रधान एकदाचे विमानात चढले.
पासपोर्ट आणण्यासाठी या अधिकार्यांना तब्बल ३० मैलांचा फेरा पडला. पण नशीब इतकेच की कॅमेरून यांच्या घरात असलेल्या कर्मचार्यांना हा पासपोर्ट अगदी लगेच सापडला आणि वेळेत सुरक्षितपणे तो पंतप्रधानांना सूपूर्द करण्यात आला. वुलविच येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पंतप्रधानांच्या सुटीवर जाण्यावरही नागरिकांकडून जोरदार टीका सुरू असल्याचेही समजते.
गेल्यावर्षीही कॅमेरून असेच कुटुंबिय आणि मित्रांसोबत पब लंचसाठी गेले असताना आपली आठ वर्षांची कन्या नॅन्सी हिला तेथेच विसरून घरी गेले होते. नॅन्सी स्वच्छतागृहात गेली होती तेव्हा पंतप्रधान मित्रांना निरोप देऊन गाडीत बसून सरळ बकींगमशायरच्या घरी पोहोचले आणि तेथे गेल्यावर नॅन्सी न आल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरीत पबला फोन केला आणि परत येऊन नॅन्सीला घरी नेले होते.