कॉलेज युवकांची ’जुगाड’ – लिटरला चक्क ३०० किमी.

मुंबई दि.३१ – पेट्रोल आणि डिझेलचे वाढत चाललेले दर वाहन उद्योगासाठी आणि ग्राहकांसाठीही चिंतेचा विषय बनले असतानाच मुंबईच्या सोमय्या कॉलेजमधील युवकांनी १ लिटर पेट्रोलमध्ये ३०० किमी धावू शकणारी कार तयार केली असून तिचे नामकरण ‘ जुगाड ‘ असे करण्यात आले आहे. ६० किलो वजनाची ही कार पेट्रोलच्या समस्येवर उत्तम उपाय ठरू शकेल असे या युवकांचे म्हणणे आहे.

टाटांची नॅनो लिटरला २० किमीचे अॅव्हरेज देते आहे तर सर्वात अधिक मायलेज देणारी कार अशी जाहिरात असलेली होंडाची अॅमेझही लिटरला २६ किमीच्या पुढे जाऊ शकलेली नाही. मात्र या सहा विद्यार्थ्यांनी बनविलेली जुगाड सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्याच्या मार्गावर आहे. या प्रयोगातील सहभागी कुणाल जैन सांगतो, महाविद्यालयाच्या वाचनालयात आम्हाला जुगाड इनोव्हेशन वरचे पुस्तक मिळाले आणि त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही ही कार बनविली आहे.

गवत कापायचे यंत्र असते त्यापासून गाडीचे इंजिन बनविले गेले आहे तर बॉडी आहे फायबरची. तीनचाकी सायकलीची चाके तिला लावली गेली आहेत. रेसिंग कारप्रमाणेच पाय पसरून ही गाडी चालवावी लागते. गाडी बनविण्यासाठी चार लाख रूपये खर्च आला आहे. मात्र लवकरच या गाडीला आंतरराष्ट्रीय ओळखही मिळणार आहे. कारण मलेशिया येथे जुलैमध्ये होत असलेल्या शेल इको मॅरेथॉनमध्ये ही गाडीही धावणार आहे.