जाहिरातींसाठी आमीरने केला ८८ कोटींचा करार

मुंबई दि.३१ – चित्रपट निवडाना अतिशय चूझी असलेल्या आणि वर्षभरात एखादाच चित्रपट देणार्‍या आमीरखानने एका व्यावसायिक कंपनीच्या उत्पादन जाहिरातीसाठी ८८ कोटी रूपयांचा करार केला असल्याचे समजते. हा करार वार्षिक स्वरूपाचा असून त्यासाठी जाहिरातींची मालिकाच आमीरला करावी लागणार आहे. त्याचा सत्यमेव जयते हा टिव्ही शो सुरू असताना त्याने कंपनीसाठी जाहिरात केली होती त्यानंतर त्याचा हा पहिलाच जाहिरात करार आहे असे सांगण्यात येत आहे. या सिरीजमधील दोन जाहिराती यापूर्वीच प्रसारित झाल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्यांची बरीचशी कमाई आजकाल जाहिरातीतून होत असते आणि कोणी कोणत्या जाहिरातीसाठी किती पैसे घेतले हाही नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र या सर्व बॉलिवूड कलाकारांना आमीरने मानधनाच्या बाबतीत खूपच मागे टाकले असल्याची नवी चर्चा आहे. करिना कपूरने बांधकाम कंपनीच्या जाहिरातीसाठी १० कोटी, कतरिनाने रंगाच्या जाहिरातीसाठी ८ कोटी, रणबीरने सॉफ्ट ड्रींकच्या जाहिरातीसाठी ८ कोटी तर सलमानने कोला जाहिरातीसाठी २० कोटींचे मानधन यापूर्वी घेतले आहे मात्र आमीर त्याबाबत या सार्‍यांच्या खूपच पुढे गेला आहे.

आमीरला जाहिरातीसाठी करारबद्ध करणार्‍या कंपनीने आमीरमुळे त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होईल अशी खात्रीच दिली असून त्यासाठीच त्याला हे मानधन देण्याचे मान्य केले आहे असे सांगितले आहे.

Leave a Comment