
पंढरपूर : सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराचे सर्व फंडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वापरायला सुरुवात झाली आहे. मतदार सध्या भल्याभल्या वक्त्यांपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भाषणाला डोक्यावर घेताना दिसत आहेत. कालच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. आनंद शिंदे त्याला उत्तर देताना म्हणाले की, पवार साहेबांचे हे सरकार आहे, तुमच्या बापाच्यानेही पडणार नाही.
पंढरपूर पोटनिवडणूक ; आनंद शिंदे यांचे फडणवीस यांना गाण्यातून उत्तर
गायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे असल्याने त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारसभांना पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. अनेक गाणी आनंद शिंदे यांची लोकप्रिय आहेत आणि गाण्यात प्रचाराचे काव्य गुंफून आनंद शिंदे यांनी धडाका उडवून दिला आहे. त्यांच्यासोबत अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्यासारखे वक्ते असूनही नागरिकांमध्ये आनंद शिंदे यांची निवडणूक गाणी लोकप्रिय होत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता बदलाच्या दिलेल्या संकेताला आनंद शिंदे आपल्या गाण्यातून उत्तर देत आहेत.
तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय,
तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय,
तुम्ही रडवताय, पण आम्ही रडणार नाय
हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय
कार्यकर्ते आनंद शिंदे यांच्या या गाण्यांना डोक्यावर घेत आहेत. मी अपीअर घेतल्याशिवाय कोठेही बाहेर जात नाही हे महाराष्ट्राला माहित आहे. पण भारत भालके हे गाववाले म्हणून माझ्या हृदयात होते आणि म्हणूनच मी त्यांचा मुलगा भागीरथसाठी प्रचारात उतरल्याचे आनंद शिंदे सांगतात.
