पंतप्रधानांची राज्यसभेवर सलग पाचव्यांदा निवड

गुवाहाटी, दि.30 -आसाममधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत राज्यातील सत्तारूढ काँग्रेसने बाजी मारली. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसचे दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. या विजयामुळे पंतप्रधान सलग पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

आसाम विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी काँग्रेसने पंतप्रधान आणि सँटिअस कुजूर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीच्या रिंगणात ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) नेते अमिनुल इस्लाम हे तिसरे उमेदवार होते. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले. एआययुडीएफ हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ यूपीएचा घटक आहे. राज्यात विरोधी बाकांवर असणार्‍या आसाम गण परिषद आणि भाजप या पक्षांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. दरम्यान, राज्यसभेवर पुन्हा निवड झाल्यानंतर पंतप्रधानांनी आसाममधील जनता, आमदार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. सध्या थायलंडच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधानांनी याबाबत निवेदन जारी केले. आसामच्या प्रगतीसाठी यापुढेही कार्यरत राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.