नवी दिल्ली, दि.२८ – सध्या होत असलेल्या इंधन खरेदीपेक्षा अधिक तेल खरेदी करा. तसेच पाकिस्तानला वगळून सागरी मार्गाने तेलाची पाईपलाईन करता येईल, असा प्रस्ताव इराण सरकारने भारतापुढे ठेवला असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
सागरी मार्गाने इंधन वाहिनी – इराणचा भारतापुढे प्रस्ताव
भारताकडून सध्या होत असलेल्या कमी इंधन खरेदीच्या पार्श्वीभूमीवर इराणने अधिक किफायतशीर दरात इंधन खरेदीचा प्रस्ताव भारतापुढे ठेवला आहे. भारताने इराणकडून इंधन खरेदी वाढवावी, यासाठी राजधानीत इराणचे मंत्री रोस्तम घेसमी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळ दाखल झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. इराण-पाकिस्तान-भारत असा तेल वाहिनीचा प्रस्ताव भारताने सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळून लावला आहे. इराणच्या शिष्टमंडळाने यावर इंधन खरेदी वाढविल्यास, पाकिस्तानला टाळून सागरी मार्गाने भारतापर्यंत तेल वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला आहे.
२०१२-१३ वर्षात भारताने इराणकडून अवघे १३.३ दशलक्ष टन इंधन खरेदी केले आहे. याआधीच्या वर्षामध्ये भारताने इराणकडून १८ दशलक्ष टन इंधन खरेदी केले होते. यासंदर्भात घेसमी यांनी भारताचे तेल मंत्री वीरप्पा मोईली यांच्याबरोबर सुमारे अडीच तास चर्चा केली. या चर्चेवर अधिक भाष्य करण्याचे टाळत घेसमी यांनी ही चर्चा चांगली झाल्याचे संगितले. भारत हा इराणसाठी भाऊ व उत्तम शेजारी असल्याचे मत यावेळी घेसमी यांनी व्यक्त केले. या चर्चेदरम्यान इराणकडून तेल खरेदी करण्याच्या मार्गात काही अडचणी असल्याचे मोईली यांनी सांगितल्याचे समजते.
