नक्षलवाद मोठं आव्हान – पंतप्रधान; सोनिया गांधी

रायपूर, दि.२७ – छत्तीगडमधील काँग्रेसच्या रॅलीमध्ये काल झालेल्या नक्षली हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर जखमींची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान आणि सोनियांनी रायपूरमधल्या रुग्णालयात धाव घेतली. नक्षलवाद हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे. नक्षलींचा हा हल्ला दुर्दैवी असून, जखमींवर उपचार ही प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिली आहे. तसंच नक्षलविरोधी एकत्र येऊन लढा उभारूया, असं आवाहनही त्यांनी केलं.

नक्षलींच्या हल्ल्यात महेंद्र कर्मा, दिनेश पटेल, उदय मुदलियार, नंदकुमार पटेल यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ह्ल्ल्यामुळे संपूर्ण छत्तीसगडमध्ये कडक बंद ठेवण्यात आला आहे. राज्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला पोलिस छावणीचं स्वरूप आलं आहे.

या घटनेत मृत्यूमूखी पडलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस भवनात श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते जखमींची विचारपूस करण्यासाठी जगदलपूर येथे दाखल झाले, अशी माहिती काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने दिली. नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या विद्याचरण शुक्ल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी गुडगाव येथे हलवण्यात आले आहे. तत्पूर्वी, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्या कुटुंबियांची देवेंद्रनगर येथे जाऊन भेट घेतली.