‘आम आदमी’ पार्टीच्या तिजोरीत २ कोटी

नवी दिल्ली, दि.२७ – ‘आम आदमी पार्टीला’ देणगी देणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढत होत असून तीन महिन्यांत पक्षाच्या तिजोरीत तब्बल 2 कोटीची देणगी जमा झाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून फारकत घेऊन अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेला हा पक्ष बघता-बघता करोडपती झाला आहे. आम आदमी पार्टी’ने अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील जनलोकपाल आंदोलनालाही देणगी प्रकरणात मागे टाकले आहे.

मार्च माहिन्यापासून पक्ष ऑनलाइन देणगी स्वीकारत असून तीन महिन्यांहून कमी वेळात 2 कोटी रुपये पक्षाच्या खात्यात जमा झाले आहेत. देणगीदारांनी अगदी 50 रुपयांपासून लाख रुपयापर्यंतची देणगी दिली आहे. यात परदेशी भारतीयांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अण्णांच्या जनलोकपालला याआधी चार महिन्यांत अवघे सव्वा कोटी रुपये मिळाले होते.

एक परदेशी भारतीय सरासरी १०० डॉलर देणगी पक्षाला देत असल्याचे पक्षामार्फत सांगण्यात आले. ऑनलाइन ट्रॅन्झक्शन मिळाल्यानंतर काही तासांतच पक्षाच्या वेबसाइटवर त्याबद्दलची माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे. काही देणगीदारांनी पक्षाला चेकने पैसे दिल्याची माहितीही पक्षाने दिली आहे. चेकमार्फत पक्षाच्या खात्यात ७० लाख रुपये जमा झाले आहेत. नोब्हेंबर २०१२ मध्ये पक्ष स्थापनेच्या वेळी शांती भूषण यांनी पक्षाला एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.

यावेळी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष सर्वच्या सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एका उमेदवाराला १४ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी असते. त्यानुसार आमच्या ७० उमेदवारांसाठी आम्हाला ९ कोटी ८ लाख रुपये जमा करावे लागणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.