सॅन फ्रान्सिस्को दि. २४ – मोबाईलचा अतिवापर उच्च रक्तदाबासाठी कारण होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात दिसून आले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेंशनच्या वार्षिक बैठकीत या संशोधनाचे अहवाल मांडण्यात आले आहेत.
इटली मधील एका रूग्णालयात या संबंधीचे संशोधन केले गेले आहे. तेथे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ५० ते ५३ वयोगटातील ९४ रूग्णांवर केलेली निरीक्षणे नोंदविली गेली. त्यावेळी या रूग्णांची स्वतंत्र खोलीत तपासणी करून रक्तदाब नोंदविला गेला आणि त्यानंतर त्यांना त्या खोलीत एकटे सोडण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना बाहेरून तीनवेळा फोन करण्यात आला. तेव्हा असे आढळले की नॉर्मल असलेला त्यांचा रक्तदाब मोबाईलवर संभाषण करताना लक्षणीयरित्या वाढला होता. १२ वेळा हीच प्रक्रिया केली गेली तेव्हा रक्तदाब वाढल्याचेच दिसून आले.
यावरून संशोधकांनी मोबाईलचा वापर केला जात असताना सिस्टॉलिक रक्तदाब वाढतो व त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोकाही वाढतो असा निष्कर्ष काढला. मोबाईलचा वापर शक्यतो कमीतकमी करा. मोबाईलचा वापर अगदी आवश्यकच असेल तर निदान रक्तदाब वाढलेला असताना तरी तो वापरू नये असा सल्ला या संशोधकांनी दिला आहे.