देशात अधुनिक रंगभूमी आणण्यात गिरीश कर्नाड यांचा मोठा वाटा: सतीश आळेकर

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – देशात अधुनिक रंगभूमीचा काळ डॉ. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या नाटकांनी आणला, त्यांच्या काळात नवीन नाटक लिहिणार्‍यांना या चार लोकांची फार भिती वाटायची कारण यांच्या तोडीचे नाटक लिहिणे एक आव्हान होते. डॉ. कर्नाड यांची नाटके वैश्‍वीक दर्जाची असून हॉलिवुडपटाला शोभेल अशी त्यांची पात्र रचना आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार सतिश आळेकर यांनी केले.

राष्ट्रीयचित्रपट संग्रहालयव आशयसांस्कृतिकच्या वतीने आयोजित समग्र गिरीश कर्नाड महोत्सवाचे उद्घाटन आळेकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, डॉ. गिरीश कर्नाड, चित्रपट संग्राहलयाचे संचालक प्रशांत पाठरावे, आशयचे सतीश जकातदार, विरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. आळेकर म्हणाले,सत्तरच्या दशकात या चार नाटककारांना शोधण्याचे काम सत्यदेव दुबे यांनी केले. दुबे यांनी यांना फक्त शोधले नाहीत तर देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवले आणि नाट्यकर्मींमध्ये वाटले. कर्नाड यांनी ऐतिहसिक पार्श्‍वभूमी असलेली नाटके सुरूवातीच्या काळात रंगमंचावर आणली, त्यांच्यावर आज हॉलीवुडच्या बिगबजेट चित्रपटांसारखे चित्रपट निघू शकतील अशी रचना त्यांनी केलेली आहे. या बरोबरच त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या नाटकातून सशक्त स्त्रीचे चित्रण करण्यात आले आहे.

लेखनाचे मुळे मराठीत – डॉ. कर्नाड
माझ्या आयुष्याचा सुरूवातीचा काळ पुण्यात गेला आहे, यामुळे पुण्या विषयी मला विशेष प्रेम आहे. मी मूळचा नाटककार आहे, चित्रपट अभिनयाकडे वळलो कारण त्यातून उपजिवेकेचे साधन मिळते. बालपण महाराष्ट्रात गेल्यामुळे त्याकाळच्या सर्व लेखकांचे लेखन मी वाचले आहे. मी कन्नड भाषेत लिहित असलो तरी माझ्या लेखनाची मुळे मराठीत आहेत असे डॉ.कर्नाड यांनी सांगीतले.

Leave a Comment