इस्त्रायल ड्रोनचा सर्वात मोठा निर्यातदार देश

जेरूसलेम दि. २० – गेल्या आठ वर्षात इस्त्रायल हा छोटासा देश ड्रोन या मानवरहित विमानांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला असल्याचे फ्रॉस्ट अॅन्ड सुलिव्हन या व्यावसायिक सल्लागार संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आठ वर्षात इस्त्रायलने ड्रोनच्या निर्यातीतून तब्बल ४.६ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे असेही या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कमाईत भारताबरोबर ड्रोन विमानातील सुधारणा करण्याबाबत जो सौदा करण्यात आला आहे त्या रकमेचा अंतर्भाव केला गेलेला नाही.

फ्रॉस्ट अॅन्ड सुलिव्हनच्या अहवालानुसार इस्त्रायलने गेल्या आठ वर्षात जेवढी लष्करी सामग्री निर्यात केली आहे त्यात ड्रोनचा वाटा १० टक्के इतका आहे. २००८ सालात इस्त्रायलने १५ कोटी डॉलर्स किमतीची ड्रोन निर्यात केली होती. हेच प्रमाण २०१० मध्ये ९७.९ कोटी डॉलर्सवर पोहोचले. २०१२ सालात आत्तापर्यंत त्यांनी २६ कोटी डॉलर्सची ड्रोन निर्यात केली आहेत. त्यात भारत इस्त्रायल ड्रोन सुधारणा करण्याबाबत करण्यात आलेल्या १० कोटी डॉलर्स या रकमेचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. अन्यथा ही निर्यात ३६ कोटी डॉलर्स इतकी आहे.