
हिमाचल हे राज्यच मुळी निसर्गाने अतिशय समृद्ध राज्य आहे. पण कोंदणात हिरा बसवावा तसे मनाली हे नितांतसुंदर पर्यटनस्थळ. हिमाचलमधील ही सर्वात सुपीक व्हॅली समजली जाते. घनदाट जंगले, वेगाने वाहणार्या नद्या, हिमाच्छादित पर्वतशिखरे, सुंदर बाजार, खाण्यापिण्याची अगदी चंगळ आणि वास्तव्यासाठी सुंदर हॉटेल्स, साहसी क्रीडा प्रकारांची सोय असे पर्यटकांना जे जे हवे ते पुरविणारे मनाली कोणत्याही हंगामात जाण्यासाठी अतिशय योग्य असे स्थळ आहे. पर्यटकांचे लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही त्याची ख्याती. प्रत्यक्षातले गांव अगदी छोटे असले तरी हिमालयातील अनेक ट्रेकसाठीचा हा बेस कॅम्प आहे. येथे गेलात की क्लब हाऊसची भेट अजिबात चुकवायची नाही. येथे टेबलटेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश, स्केटिंग, बोटिंग अशा विविध क्रीडाप्रकारांचा आनंद आपण घेऊ शकतो व त्यामुळे तरूणांतही मनाली फेव्हरिट डेस्टीनेशन आहे.




