मराठी:शिक्षणातून अदृश्य पण वापरात बाजी

तीस पस्तीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात एनडीए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिका संस्थेबाबत एक म्हण महाराष्ट्रात प्रचलीत होती ती म्हणजे ‘एनडीए महाराष्ट्रात आहे पण एनडीएमध्ये महाराष्ट्र आहे का ’याचा अर्थ असा होता की, खडकवासल्यात मोठ्या परिश्रमाने देशाच्या संरक्षण विभागात उच्चपदस्थ होण्यासाठी एनडीए उभी झाली पण त्यात प्रवेश प्रक्रियेत महाराष्ट्रीय मुले कमी पडत लागल्याने त्यांना प्रवेश मिळत नसे. आता परिस्थिती बदलली आहे. पण ‘महाराष्ट्रात मराठी शिक्षण असले तरी शिक्षणात मराठी राहिलेले नाही. मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वेगाने कमी होत आहे. आणि जेथे मराठी माध्यमाच्या शाळा आहेत तेथे मुलांची संख्या घटत आहे. एका बाजूने मराठीच्या शिक्षणाची टोकाची दुरावस्था आहे तर दुसर्‍या बाजूला मराठीला गती देणार्‍या मोठ्या घटना घडत आहेत याचे प्रत्यंतर या आठवड्यात आले. त्यातील घटनांचा क्रमच द्यायचा झाला तर संगणकावरील मराठी अवघ्या दोन तासात शिकता यावे याची एक प्रणाली ज्ञान महामंडळाचे कार्यकारी सचालक श्री विवेक सावंत यांनी प्रकाशित केली आहे. त्याच वेळची दुसरी घटना म्हणजे राज्याचे जाणता राजा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांनी मराठीतील प्राथमिक शिक्षणाच्या स्थितीबाबत अतिशय चिंता व्यक्त केली आहे.

सर्वसाधारणपणे ‘नवी पिढी वाचत नाही, मराठी मातृभाषेचे त्यांचे वावडे आहे. प्रत्येकाच्या घरात टीव्ही नावाचा जो ‘मॅड बॉक्स’ प्रकार गेल्या काही वर्षात आला आहे त्यामुळे ‘वाचायला वेळ आहे कोणाला’ अशी जी टिपणी केली जाते पण मराठीतील वाचनक्षमता ही जागतिक पातळीत आघाडीची आहे हेही या आठवड्यात सिद्ध झाले. एक म्हणजे शालेय शिक्षणाच्या पातळीवर जरी मराठीची आणि मराठी माध्यमाच्या शिक्षणाची प्रचंड आबाळ होत असली तरी एक ज्ञानमहामंडळाच्या पाच हजार संगणक प्रशिक्षण केंद्रात गेली पंधरा वर्षे सतत पाच लाख तरुण संगणकीय प्रणाली व त्यातही मराठी माधयमातून शिक्षण यांचे प्रशिक्षण घेत आहेत.आयटी क्षेत्रात इंजिनिअरिंगची पदवी घेवून कामाला लागलेल्याची संख्या आज मोजता येते. कारण तीही काही लाख आहे. पण दहावी नापास, बारावी नापास, असे असले तरी वर्षे सहा महिन्यांचे काही कोर्सेस करून कामाला लागलेले तरुणही मोठ्या प्रमाणावर आहेत. आज आता संगणकावर दोन तासात मराठी माध्यम वापरायला शिकवणारे तंत्र ज्ञानमहामंडळाने विकसित केले आहे. त्यांचा काही लाख जणांनी उपयोगही करून घेतला पण पंचवीस वर्षापूर्वी त्यासाठी डॉ विजय भटकर यांनी जे परिश्रम घेतले ते न विसरता येण्यासारखे आहेत.पंचवीस वर्षापूर्वी जेंव्हा अमेरिकेने आपल्याला परममहासंगणक नाकारला तेंव्हा त्यावेळी ते आव्हान डॉ विजय भटकर यांनी स्वीकारले. पण त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वीकारताना त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी याना एक अट घातली ती म्हणजे तो परममहासंगणक तयार होण्यापूर्वी ‘मी देव नागरी व अन्य भारतीय भाषांची संगणकीय लिपी तयार करीन.’ पंतप्रधानांनी त्याना त्याचे कारण विचारले. त्यावर डॉ भटकर उत्तरले की, संगणकावर भारतीय भाषा न बसता तर येथे परममहासंगणक आला तर तो येथील भाषा खावून टाकील. हे मी भाषांच्या अभिमानापोटी बोलत नसून तरुणांच्या चिंतनाला जर मातृभाषेचे माध्यम नसेल तर येथे पुन्हा इंग्रजांना यायला विमान िंकंवा बोटी लागणार नाहीत ते काम कॉम्प्युटरच करेल.’

संगणक आला म्हणजे सगळ्या समस्या संपल्या असे नाही पण इंग्रजीचे फारसे ज्ञान असले तरी तरुणांनी बरेच अंतर कापले आहे हे लक्षात येईल. संगणकाइतकाच वाचनाचाही मुद्दा आहे. मराठी भाषेची वाचनीयता किती याबाबत गेल्या दहा वर्षात जे पाहणी अहवाल आले आहेत ते सुखद धक्कादायक आहेत. पाच वर्षापूर्वी अमेरिकेच्या जी एफके डॅश एनओपी या निरनिराळ्या पाहणी संघटनेने जगातील वाचनीयता या विषयावर जगातील तीस हजार लोकांची पाहणी करून जो अहवाल प्रकाशित केला आहे त्यानुसार भारतीयंाची वाचनक्षमता जगात आघाडीची आहे. जगातील आज वाचनाची सरासरी आठवड्याला पाच तास चाळीस निमिटे आहे पण भारतात तीच वाचनीयता दहा तासापेक्षा अधिक आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय पातळीवरील निरनिराळ्या संस्था व वृत्तपत्रे यांनी यावर जो पाहणी आढावा घेतला आहे, त्यातही तोच निष्कर्ष हाती आला आहे.
.
मराठी शालेय शिक्षणाची स्थिती मात्र खरेच दयनीय आहे. गेल्या पंधरा वीस वर्षात मराठी माध्यमाच्या शाळा सुसूत्ररित्या दुर्लक्षित करण्यात आल्याचे चित्र आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या महापालिकांच्या शाळेत शिक्षकांची संख्या मुलांच्या संख्येशी स्पर्धा करू लागली आहे. एखादी भाषा ही ज्ञानभाषा आणि यशभाषा व्हायची असेल तर सर्वांचे प्रयत्न कारणीभूत लागतात. माहितीतंत्रज्ञानाचा काळ आल्यापासून काही भाषा वेगाने चांगली गती घेवू लागल्या आहेत त्याच प्रमाणे काही भाषा या संपल्या आहेत हे विसरता कामा नये. मराठीत मुलांनी मोठे अंतर कापले आहे पण ती टिकून राहण्यासाठी जेवढे प्रयत्न होत आहेत तेवढे पुरेसे नाहीत.

यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठीत तरुणांना ‘तुम्ही मराठीसाठी काही करत नाही’ असे सुनावण्याऐवजी ‘नव्या पिढीच्या वतीने संत ज्ञानेश्वरांनी ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे आश्वासन देवून ठेवले आहे, त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे.