एकुलती एक’ २३ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस

८० आणि ९० या दर्शकांत मराठी चित्रपटांना जगवणारे, मराठी प्रेक्षकांना थिएटरकडे अक्षरश: एकहाती खेचून आणणारे अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यंदा आपल्या कारकीर्दीच सुवर्णमहोत्सव साजरा करत असून त्यानिमित्त रसिकांसाठी त्यांनी नव्याको-या चित्रपटाची भेट आणली आहे. वडील-मुलीच्या भावस्पर्शी नात्यावर आधारित ‘एकुलती एक’ हा त्यांचा करमणूकप्रधान चित्रपट २३ मे रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे पिळगांवकरांची तिसरी पिढी, सचिन-सुप्रिया यांची कन्या श्रिया या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.

परस्परांना संपूर्ण अनोळखी असलेल्या वडील व मुलीच्या भावस्पर्शी नात्याची मनोरंजक कथा ‘एकुलती एक’ मध्ये पहायला मिळणार आहे. वास्तव आयुष्यातील वडील-मुलीची जोडी, अर्थात सचिन आणि श्रिया पिळगांवकर हेच रूपेरी पडद्यावर वडील-मुलीची जोडी रंगवताना दिसणार आहेत. सचिन पिळगांवकर यांच्या सुसंस्कृत, निर्मळ विनोदाची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. ‘एकुलती एक’ मध्येही नातेसंबंधांची भावस्पर्शी कथा मांडताना या स्वच्छ, सुसंस्कृत विनोदाचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे बापलेकीची हृदयस्पर्शी कथा पाहातानाच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.

सचिन आणि अशोक सराफ ही अभेद्य जोडीही या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा आपला करिश्मा दाखवण्यासाही सिद्ध झाली आहे. श्रियाला आपल्या पहिल्याच चित्रपटात आपली वडील सचिन आणि काका अशोक सराफ अशा दोन्ही दिग्गज अभिनेत्यासह काम करायची संधी मिळाली आहे. शिवाय, सिद्धार्थ मेनन हा नवा चेहराही या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीला लाभणार आहे.

सोनू निगमच्या आवाजातील दोन धम्माल गाणी हे ही या चित्रपटाचं एक प्रमुख आकर्षण आहे. सचिन पिळगांवकर यांच्याच ‘नवरा माझा नवसाचा’मधल्या ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ या श्रवणीय आणि लोकप्रिय गाण्यानंतर सोनू निगम ‘एकुलती एक’ मधून मराठीत पुन्हा हंगामा करायला सज्ज झाला आहे. जितेंद्र कुलकर्णीच्या सुमधूर संगीताने सजलेल्या या चित्रपटात स्वत: सचिन यांनी अगदी हटके शैलीतलं एक गाणं गायलं आहे.

चित्रपटाची कथा सचिन यांची असून पटकथा सचिन आणि क्षितीज झारापकर यांची आहे. संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले असून छायालेखन राहुल जाधव यांचे आहे. सचिन, श्रिया, अशोक सराफ यांच्यासह सिद्धार्थ मेनन आणि किशोरी शहाणे यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत.