पीएच. डी. खरेदीसाठी पुण्यातील प्राध्यापक मेघालयात

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या एका
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि एका प्राध्यपकाने मेघालयातील सीएमजे
विद्यापीठाकडून पीएचडीची बोगस पदवी घेतली असल्याची चर्चा
शिक्षणक्षेत्रात सुरु आहे.

सीमजे विद्यापीठ लाखो रूपये घेऊन पीएचडीच्या बोगस पदव्या विकत असल्याचे
प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनांनी
या संदर्भात राज्य आणि केंद्र शासनाकडे तक्रारी केल्या होत्या त्यावरून
तपास अधिकार्‍यांनी सीएमजे विद्यापिठात छापाही टाकला होता. हे प्रकरण
उघडकीस आल्यानंतर विद्यापिठाकडून सन 2009 ते 2013 दरम्यान ज्यांनी अशा
पीएचडीच्या पदव्या घेतलेल्या आहेत त्या सर्वांच्या पदव्या रद्द केल्या
आहेत. पैसे घेवून पदव्या विकणारे विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव सहीत
इतर संचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत.

मेघालयाचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनीही या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे सूचित
केले आहे. बोगस पीएचडी पदव्यांप्रकरणी पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विद्यापीठात केवळे दहा डॉक्टरेट
प्राध्यापक असताना विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुमारे 86 विषयांमध्ये
पीएचडीसाठी प्रवेश देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या विद्यापीठाने
2012-13 या शैक्षणिक वर्षात तब्बल 434 जणांनी पीएचडी पदवीची खिरापत
वाटल्याची माहिती पुढे आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु चंद्र मोहन झा
गेल्या दोन आठवड्यांपासून गायब असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने
अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे विद्यापीठ खासगी असून
विद्यापीठाच्या वेबसाईटवर मात्र, एस्टॅब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ मेघालय
अ‍ॅज पर सेक्शन 2(एफ) ऑफ यूजीसी अ‍ॅक्ट 1956 अशी दिशाभूल करणारी माहिती
देण्यात आली आहे.

या विद्यापिठाकडून बोगस पदव्या विकत घेणार्‍यात पुणे शहर आणि
जिल्ह्यातील काही प्रद्यापकांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.
समजलेल्या महितीनुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयामधील दोन
जणांनी सीएमजे विद्यापिठाकडून पीएचडीच्या बोगस पदव्या विकत घेतल्याची
चर्चा आहे. अशा पदव्या घेणार्‍यांनी कोणत्याही विषयावर प्रबंध सादर
केलेले नाहीत. हे सारे खरे असले तरी या पीएचडी पदवी मिळाल्या बद्दल
जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने या दोघांचा एक महिन्यापुर्वी सत्कारही
करण्यात आला होता.

Leave a Comment