नवी दिल्ली – दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये बहुजन समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान यांनी ‘ वंदे मातरम् ‘ या भारताच्या राष्ट्रीय गीताचा अपमान केला होता. सध्या या राष्ट्रीय गीताचा अपमानावरून सर्वत्र रान पेटले आहे. भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. वंदे मातरमला विरोध करणा-यांनी देशाबाहेर चालते व्हावे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय गीताचा अपमानाचा मुद्दा चिघळला
या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. लोकसभाध्यक्ष मीरा कुमार यांनी बसप खासदार शफीकुर रहमान यांच्या कृतीबद्धल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ; तसेच अशा स्वरुपाच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनीही रहमान यांची कृती असमर्थनीय असल्याचे सांगितले.
याबाबत बहुजन समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान यांनी आपली काही चूकच नसल्याचा दावा करत माफी मागण्यास नकार दर्शविला. भारतीय घटनेनेच मला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. मी माझ्या धर्माचे पालन करीत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने मात्र याबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. वंदे मातरमला विरोध करणा-यांनी देशाबाहेर चालते व्हावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
