शिवसेनेच्या महिला आमदाराने केली ‘त्या’ फ्रेंच डेटिंग अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी


मुंबई – ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपने जागतिक महिला दिनी महिलांच्या डेटिंगबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला. सध्या या अहवालाची चर्चा होत असून, त्यात ४८ टक्के विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी ग्लिडेन या डेटिंग अ‍ॅपच्या अहवालावर नाराजी व्यक्त करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला.

विधान परिषदेत महिला दिनी बोलताना आमदार मनिषा कायंदे यांनी या ग्लिडेनच्या सर्वेकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, आज महिला दिन आहे आणि भारतीय महिलांच्या यशोगाथा आपण वाचत असतो, ऐकत असतो. त्याचा उहापोह करतो आणि नेमके अशाच दिवशी ग्लिडेन नावाच्या एका फ्रेंच अ‍ॅपने असे म्हटले आहे की, त्यांनी ६० कोटी लोकांचा सर्वे केला आहे. त्यात भारतीय महिलांचा देखील सर्वे केला आहे. मूळात हे अ‍ॅप एक डेटिंग अ‍ॅप आहे. ६० टक्के महिलांपैकी ४८ टक्के महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात. भारतीय महिलांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे कायंदे म्हणाल्या.


शेतकरी, कष्टकरी महिला आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला आहेत. नेमके महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो काही तथाकथित निष्कर्ष मांडला आहे. तो घृणास्पद आणि निंदनीय आहे. भारतीय महिला हे खपवून घेणार नाही. हा सर्वे खोटारडा आहे, यात महिलांची बदनामी करण्यात आली आहे. त्यांनी अ‍ॅपचा सर्वे वृत्तपत्रातही प्रसिद्ध केला आहे. मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी हे केले असून, त्यासाठी भारतीय महिलांची बदनामी करणे निंदनीय आहे. चूल मूल सांभाळून महिला घराबाहेर पडतात. या अ‍ॅपवर बंदी आणावी, तसे निर्देश द्यावे, अशी मागणी कायंदे यांनी केली आहे. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिले आहेत.