पाक कैदी सनाउल्लाहचा मृत्यू

चंडीगड: जम्मू येथील कारागृहात हल्ला झालेला पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याचा गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. जम्मू येथील कारागृहात इतर कैद्यांनी एक आठवड्यापूर्वी हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. चंडीगड येथील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या रुग्णालयात सनाउल्लाह याच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान एकेक अवयव निकामी होत सनाउल्लाह याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ताब्यात मिळावा अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.

हेरगिरीच्या आरोपावरून २३ वर्ष पाकिस्तानातील कोट लखपत कारागृहात खितपत पडलेल्या सरबजित सिंग याच्यावर इतर कैद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यात सरबजित यांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसातच सनाउल्लाह याच्यावर हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे सरबजीतच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रकार असल्याचे मत पाकिस्तानने व्यक्त केले आहे. मात्र सनाउल्लाह याच्यावर हल्ला करणारा कैदी हा सनाउल्लाह याचा निकटवर्तीच असल्याचा जम्मू कारागृहाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.

सनाउल्लाह याच्या मृत्यूबद्दल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतातील कारागृहात ४७ पाकिस्तानी कैदी शिक्षेचा कालावधी पूर्ण होऊनही बद्ध असल्याचा दावा करून त्यांच्या सुटकेची मागणी पाकिस्तानी उच्चायुक्त सलमान बशीर यांनी केली आहे.

सनाउल्लाह याला सन १९९९ मध्ये दहशतवादी कृत्यातील सहभागाबद्दल अटक करण्यात आली. त्याला दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली.