पाक, बांग्लादेशातून वॉल्ट डिस्ने बाहेर पडणार

पाकिस्तान आणि बांगला देशातून आपला व्यवसाय बंद करून एप्रिल २०१४ पर्यंत बाहेर पडण्याचा निर्णय जगप्रसिद्ध वॉल्ट डिस्ने कन्झ्युमर प्रॉडक्टने घेतला आहे. या दोन देशांबरोबरच इक्वेडोर, व्हेनेझुएला आणि बेलारूस येथील उद्योगही कंपनी बंद करणार आहे. या पाचही देशात कामगार सुरक्षा संबंधातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे अध्यक्ष बॉब चेपॉक यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात बांगला देशात फॅक्टरी कोसळून ४०० कामगार मृत्युमुखी तर २५०० जखमी झाल्याची घटना घडली होती. त्याअगोदरच कंपनीने या देशातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबरमध्ये ढाका येथील फॅक्टरीला लागलेल्या आगीत ११२ जण ठार झाले होते. तसेच गेल्या वर्षी पाकिस्तानात फॅक्टरीला आग लागून २६२ जण ठार झाले होते. वॉल्ट डिस्नेने त्यांचा उद्योग या दोन्ही देशातून बंद केल्यानंतर या दोन्ही देशांच्या गार्मेंट उद्योगावर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत.

कंपनीने मात्र वर्ल्ड बँकेने वरील देशांच्या सादर केलेल्या अहवालावरून तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा खुलासा केला आहे.