कॉलगर्ल्स आणि त्यांच्या ग्राहकांना पोलिसांचा हिसका

पुणे दि.१ – देशाच्या विविध राज्यातून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या सहा कॉलगर्ल आणि त्यांच्याकडे आलेल्या चार ग्राहकांना पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आज ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदविले. ग्राहकांवर गुन्हे नोंदविले जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले.

बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथील अजिंक्य लॉजवर वेश्याव्यवसाय चालत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. येथे देशाच्या विविध राज्यातून कांही कॉलगर्ल १० दिवसांच्या करारावर आणण्यात आल्या असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित लॉजवर धाड टाकली. त्यावेळी सहा कॉलगर्ल आणि त्यांच्यासमेवत असलेल्या चार ग्राहकांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या व्यवसायातील मुख्य संशयित अजय पाटील हा अद्यापी पोलिसांना सापडलेला नाही. अजय पाटील या प्रकारे शहरात विविध ठिकाणी सेक्स रॅकेट चालवित असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

बर्गे म्हणाले की यावेळी प्रथमच ग्राहकांवरही गुन्हा दाखल केला गेला आहे. आत्तापर्यंत अशा रेड मध्ये सापडलेल्या ग्राहकांना केवळ ताकीद देऊन सोडून देण्यात येत असे मात्र वरीष्ठ अधिकार्‍यांनी यावेळी ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिेले होते. त्यामुळे वेश्याव्यवसायत गुंतलेल्यांना ते सहजासहजी सुटणार नाहीत असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संदेशच दिला गेला आहे. लॉजचा मालक सुनील तुपे आणि मॅनेजर वेंकट यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.