मुंबई- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने दोन दिवसापूर्वीच पुणे वॉरियर्सची जी धुलाई केली ती कोणीच विसरू शकत नाही. त्याने जलदगतीने केले हे शतक त्याच्या चाहत्यांना समर्पित केले आहे. त्यातच शनिवारी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गाठ मुंबई इंडियन्सशी पडली आहे. त्यामुळे आज गेलच्या बॅटचे टार्गेट मुंबई इंडियन्सचे गोलंदाज असणार आहेत. याआधी झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. या लढतीला गेल वि. मुंबई असेच स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल या सामन्यात कशी फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेलला रोखण्याची जबाबदारी लसिथ मलिंगावर असणार आहे. मात्र त्याच्यासोबत इतर गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी करायला हवी. त्याची फलंदाजी पाहण्याच्या तयारीत त्याचे लाखो चाहते आहेत.
आता पर्यंत मुंबई इंडियन्सने ७ लढतींमधून ४ लढतींमध्ये विजय मिळवला आहे. गेल्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सला त्यांच्याच मैदानात धूळ चारल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या आत्मविश्वासाची भर पडली आहे. रिकी पॉंटिंग त्या लढतीत स्वतःहून बाहेर बसला. याचा फायदा संघाला झाला. ड्वेन स्मिथने सलामीवीर म्हणून चोख कामगिरी बजावली. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, कायरॉन पोलार्ड, मिचेल जॉन्सन हे खेळाडू फॉर्ममध्ये असल्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयाची आशा बाळगता येणार आहे.
दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ८ सामन्यांमधून ६ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणूनही बघितले जात आहे. तसेच गेलशिवाय या संघात आणखीही ‘मॅचविनर’ आहेत. कोहली, अब्राहम डिव्हिलीयर्स, तिलकरत्ने दिलशान या खेळाडूंमध्येही सामना फिरवण्याची कुवत आहे.