दिल्लीत सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

दिल्ली – गेल्या काही दिवसापासून दिल्ली शहरात सुरु असलेले बलात्कारचे दृष्टचक्र काही केल्या थांबण्यास तयार नाही असेच दिसते. शहरातील बादरपूर भागात एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला शौचालयात फेकून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीला उपचारासाठी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

दक्षिण दिल्लीतील बादरपूर भागातील पुरुष शौचालयात जखमी अवस्थेत ही सहा वर्षीय मुलगी आढळून आली. मुलीच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. तसेच तिच्या शरीरावरही ब्लेडने वार केलेले आहेत. या मुलीची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉ. विपलाव यांनी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच पोलिसाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. याप्रकरणी त्यांनी शौचालयाजवळ असलेल्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्यासोबतच इतर काही जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे पण कसून चौकशी केली जात असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अजय चौधरी यांनी दिली.