इस्लामाबाद, दि.२७ -पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्या अपहरणाचा कट तालिबानी दहशतवाद्यांनी आखला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी या कटाबाबतची माहिती दिली आहे. सध्या अटकेत असलेल्या मुशर्रफ यांना त्यांच्याच फार्महाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.
गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांच्या हवाल्याने जिओ न्युज वाहिनीने मुशर्रफ यांच्या अपहरणाच्या कटाविषयीचे वृत्त दिले आहे. फार्महाऊसवरून न्यायालयात नेताना मुशर्रफ यांचे अपहरण होऊ शकते. हा कट तडीस नेण्यासाठी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही बंदी घालण्यात आलेली संघटना इतर दहशतवादी गटांची मदत घेत असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. तालिबानचा हा कट उधळून लावण्यासाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची आणि कडक पाळत ठेवण्याची सूचनाही गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना केली आहे.
मुशर्रफ यांनी जवळपास चार वर्षे परदेशांत आश्रय घेतला होता. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी ते अलिकडेच मायदेशी परतले. त्यापाठोपाठ तालिबानने मुशर्रफ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, मुशर्रफ यांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांची पथके स्थापन केल्याचेही जाहीर केले. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांच्या फार्महाऊसजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. अर्थात, कारमधील स्फोटके तातडीने निकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली होती.