अनधिकृत बांधकामाला विरोधच- शरद पवार

मुंबई – ‘ ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मी आहे . बेकायदा इमारतींमध्ये राहणा-या गरिबांची घरे पाडू नका. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी घरे उपलब्ध नसतील. त्यामुळे येत्या काळात गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. याची दखल घेण्याची गरज आहे. ‘, असे मत केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. यासंदभात पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवले आहे.

मुंब्य्रातील इमारत दुर्घटननेनंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भातच पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ठाण्यातील ७० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. ही संख्या लक्षणीय आहे. या धोकादायक इमारती तशाच ठेवल्या, तर ते भविष्यात अपघातांना आमंत्रण देण्यासारखे आहे. पण कारवाई केल्याने लाखो लोक बेघर होतील, त्याचाही विचार करा, असेही पवार यांनी म्हटले आहे.

पत्रात म्हटले आहे की, ‘ गेल्या काही दिवसपासून अनधिकृत बांधकामी फोफावली आहेत. त्यामुळे गरिबांचा फायदा घेणा-या विकासकांवर कठोर कारवाई करावी. तसेच धनिकांबरोबरच अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणा-या आमदारांच्या बांधकामांवरही कारवाई करावी ‘, अशी मागणी त्यांनी केली आहे.

येथील काही धनिकांनी अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. त्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी, तसेच यापुढे राज्यातील कोणत्याही शहरात अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाही, याची दक्षता घ्या. त्यासाठी संबंधित यंत्रणांवरही वेळप्रसंगी कारवाई करा, असेही पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment