कर्नाटकमध्ये मोदींची एकच प्रचारसभा

बंगळूर, दि.२६ – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटकात झंझावाती प्रचारदौरा करणार असल्याची चर्चा होती. मात्र, मोदी कर्नाटकात केवळ एकच प्रचारसभा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकमध्ये ५ मे यादिवशी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचारमोहिमा राबवत आहेत.  राज्यातील सत्तारूढ भाजपही त्याला अपवाद नाही. भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व स्टार प्रचारकांना प्रचारात उतरवले आहे. मोदीही झंझावाती प्रचारदौरा करतील, असा दावा कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, तो फोल ठरला आहे.

मोदी केवळ एकच प्रचार सभा घेणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. ही सभा येत्या रविवारी बंगळूर शहरात होणार आहे.कर्नाटकात भाजपला सत्ता राखणे अवघड जाणार असल्याचेच सध्याचे राजकीय चित्र आहे. सरकारविरोधी लाट, सरकारची घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेली कारकीर्द, अंतर्गत संघर्ष आदी कारणांमुळे भाजपला कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळवणे जवळपास अशक्य असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे. त्यामुळेच भाजपसाठी जोरदार प्रचार करूनही पक्षाची कामगिरी सुमार झाल्यास आपल्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी अटकळ बांधून मोदी कर्नाटकात झंझावाती प्रचार दौरा करण्यास राजी नसल्याचे मानले जात आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच मोदी जपून पावले उचलत असल्याची चर्चा आहे.