पुणे दि.२३ – अमेरिका आणि इस्त्रायलच्या पावलावर पाऊल टाकत पुण्यातील लष्करी महाविद्यालयाने सैनिकांच्या डीएनए रेकॉर्ड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली असून २०१४ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे समजते. युद्धात, हल्ल्यात अथवा अपघातात सैनिकाचा मृत्यू झाला तर बरेचवेळा ओळख पटविणे अशक्य बनते. डीएनए रेकॉर्डमुळे सैनिकाच्या शरीराचा एखादा स्नायू जरी मिळाला तरी त्यापासून सैनिकाची अचूक ओळख पटविणे शक्य होणार आहे. भारतीय लष्करात ११ लाख सैनिक आहेत.
सध्या प्रत्येक सैनिकाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून संबंधित ठिकाणचे लष्करी वैद्यकीय अधिकारीच हे काम करत आहेत. त्यानंतर हे नमुने पुण्यात आणून त्यांची साठवण केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सैनिकाची अचूक माहितीही संकलित केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक नमुन्याला टॅग लावले जात आहेत. या प्रकल्पाला आर्मड फोर्सेस रिसर्च कमिटीने मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी डीएनएन तपासणी ही अतिशय खात्रीची आणि अचूक तपासणी आहे. अमेरिका आणि इस्त्रायल येथे ही सुविधा अनेक वर्षांपासून वापरात आहे. विशेषतः अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यानंतर त्याची गरज प्रकर्षाने जाणवली होती असेही संबंधित अधिकार्यांनी सांगितले. ते म्हणाले की अशा प्रकारे गोळा केलेले नमुने २१ वर्षांपर्यंत जतन करता येतात.
सीमाभागात बरेचदा स्फोट अथवा गोळीबारासारख्या घटना घडतात आणि त्यात सैनिकांना मृत्यू येण्याचे प्रमाणही मोठे असते. अनेकदा हे मृतदेह इतके छिन्नविछिन्न असतात की त्यांची ओळख पटविणे अवघड होते. डीएनए रेकॉर्डमुळे हे सहज शक्य होणार आहे.